वृत्त संस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हरयाणाचा नेमबाज सरबज्योत सिंगने 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. सरबज्योतसाठी पुरूषांच्या एअर पिस्तुल नेमबाजीत हे पहिलेच राष्ट्रीय विजेतेपद आहे. या स्पर्धेत कनिष्ठ आणि युवा गटाचे विजेतेपद शिवा नरवालने मिळविले.
पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाज सरबज्योतने 242.3 गुणांसह सुवर्णपदक हरयाणाच्या शिवा नरवालने 241.7 गुणांसह रौप्य, दिल्लीच्या हर्ष गुप्ताने 221.2 गुणांसह कांस्य पदक पटकाविले. सौरभ चौधरीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कनिष्ठ पुरूषांच्या विभागातील 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत शिवा नरवालने 246.7 गुणांसह सुवर्ण, सौरभ चौधरीने 246.5 गुणांसह रौप्य तसेच हरयाणाच्या सागर भार्गवने 243.1 गुणांसह कांस्यपदक मिळविले. या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत विविध राज्यातील सुमारे 4500 स्पर्धक सहभागी झाले असून ही स्पर्धा 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.