१३४ जणांचे कोरोना लसीकरण
ओटवणे / प्रतिनिधी-
सरमळे सारख्या ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाच्या ऐनवेळी उद्दभवलेल्या वीजेसह वाय-फाय नेटच्या समस्येवर मात करीत अखेर या गावात कोरोना लसीकरण झाले. यावेळी ४५ वर्षावरील १३४ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.
या लसीकरणाबाबत गावचे उपसरपंच समीर माधव यांनी स्वतः पुढाकार घेत त्यासाठी तळकट आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आणि गावात घरोघरी फिरून लाभार्थींना माहिती दिली. त्यानंतर लसीकरणाचा दिवस ठरला. मात्र लसीकरणाच्या दिवशीच पहाटे वाफोली गावात विद्युत खांब कोसळल्याने प्रथम वीज गुल झाली. पाठोपाठ नेटही गायब झाले. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. मात्र या गावातील दत्तकुमार देसाई यांनी तत्परता दाखवित आपल्या इन्व्हर्टरसह वायफाय नेट लसीकरणाच्या ठिकाणीं तात्काळ उपलब्ध केले. त्यानंतर लसीकरणास सुरवात झाली. आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.