बेनकनहळ्ळी पीडीओसह संबंधितांवर कठोर कारवाई करा, जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
सरस्वतीनगर, पाईपलाईन रोड-गणेशपूर या रस्त्याचे रुंदीकरण बेकायदेशीररित्या करण्यात आले आहे. येथील मालमत्ताधारकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता इमारती आणि संरक्षण भिंती पाडण्यात आल्या. एकप्रकारे हुकूमशाही करण्यात आली असून या रस्त्यासंदर्भात न्यायालयात वाद सुरू असताना याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सामील असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वास्तविक हा रस्ता बुडा कार्यक्षेत्रात येतो. मात्र बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचे पीडीओ आणि केवळ एक-दोन सदस्यांनी हा कारभार केला आहे. तेव्हा त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. अनेकांच्या इमारती, संरक्षण भिंती पाडून जवळपास कोटय़वधी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. संबंधितांना कोणी अधिकार दिला आहे? त्याची चौकशी करून पीडीओंवरही कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी ऍड. प्रियांका हन्नुरकर, प्रतापसिंग मोहिते, बाळाराम पाटील, अजिंक्मय एस. पाटील, सुशील होनगेकर, मनोहर आय. पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मोहिते कुटुंबीयांची इमारत जमीनदोस्त
या रस्त्यावर रविंद्र मोहिते, दयानंद मोहिते, अभिषेक मोहिते आणि अन्नपुर्णा जोतिबा मोहिते यांची इमारत होती. 1982 साली ती इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीमध्ये तेलाचे डबे तसेच इतर कागदपत्रे होती. असे असताना कोणतीच पूर्वसूचना न देता जेसीबीच्या साहाय्याने मोठी इमारत पाडली आहे. यामध्ये 11 लाखांहून अधिक रुपयांचे ऑईल होते. ते देखील लंपास करण्यात आले आहे.
याबाबत कोणतीही पूर्वकल्पना न देता ही इमारत पाडल्याचे रविंद्र मोहिते यांनी सांगितले. जवळपास 80 लाखाचे नुकसान झाले असून काही जणांनी जाणूनबुजून हा प्रकार केला आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्राम पंचायत पीडीओ व केवळ दोन ते तीन सदस्य वगळता इतर कोणीही सदस्य आले नव्हते. मात्र त्या तिघांनीच हे कारस्थान केल्याचा आरोप करून झालेले नुकसान पीडीओसह या तिघांनी द्यावे, अशी मागणीही केली आहे.