बंद घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज पळविला : परिसरात भीती
प्रतिनिधी / बेळगाव
सरस्वतीनगर-गणेशपूर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 3 लाखाचा ऐवज पळविण्यात आला आहे. गुरुवारी भरदिवसा झालेल्या या घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ा वाढल्या असून गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.
पत्रकार चंद्रकांत रामचंद्र पाटील यांच्या घरी चोरी झाली आहे. चंद्रकांत व त्यांच्या पत्नी सुवर्णा हे दोघेही शिक्षक आहेत. गुरुवार दि. 17 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता हे दाम्पत्य घराबाहेर पडले. त्याआधीच परीक्षेसाठी त्यांची मुलेही घराबाहेर पडली. त्यामुळे घराला कुलूप लावण्यात आला होता.
सकाळी 10.30 ते 11.45 यावेळेत चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. कपाटातील नेक्लेस, अंगठय़ा, कर्णफुले असे सहा तोळय़ांचे दागिने, पैंजण व तीन हजार रुपये रोख रक्कम पळविली आहे. भाडेकरुंनी घरात चोरी झाल्याचे सांगताच चंद्रकांत व त्यांचे कुटुंबीय घरी परतले. कॅम्प पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरीनंतर चोरटय़ांनी वाहनातून पलायन केले असावे, असा संशय आहे. कॅम्प पोलीस तपास करीत आहेत.