प्रतिनिधी / बेळगाव
सरस्वती वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 13 रोजी सकाळी 10.30 वा. वाचनालयाच्या माई ठाकुर सभागृहात पार पडली. प्रारंभी वाचनालयाचे हितचिंतक अशोक याळगी, तनय हुईलगोळ तसेच कोविडमुळे मृत पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, उपाध्यक्ष एस. जी. आरबोळे, कार्यवाह आर. एम. करडेगुद्दी, विश्वस्त जी. बी. इनामदार, ऍड. अजय सुनाळकर उपस्थित होते. स्वरुपा इनामदार यांनी संपूर्ण कार्यकारिणी सभासद, आर्थिक देणगीदार, पुस्तके व इतर देणगी देणारे या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कोविड काळातसुद्धा सर्व नियमांचे पालन करून वाचनालयाचे कामकाज सुरळीतपणे सुरू होते. जानेवारी 2021 पासून वाचनालयाचे सर्व कार्यक्रम पूर्ववत सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सुहास सांगलीकर यांनी जमा-खर्च सादर केला. आर. एम. करडेगुद्दी यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. याच सभेत वाचनालयाच्या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली.
सभेला संचालक डॉ. दत्तप्रसाद गिजरे, जगदीश कुंटे, मनीषा सुभेदार, आनंद कुलकर्णी, विजय देशपांडे, स्नेहा सांगलीकर, किरण इनामदार, अमोल जैन, महेश आरबोळे आदी उपस्थित होते. सभेसाठी सविता पारनट्टी व जयश्री यांचे सहकार्य लाभले. आर. एम. करडेगुद्दी यांनी आभार मानले.