रेवंडी भद्रकाली मंदिर चोरीप्रकरण
प्रतिनिधी / मालवण:
मालवण तालुक्यात काही दिवसांच्या फरकाने दोन मंदिरातील फंडपेटय़ा फोडण्यात आलेल्या आहेत. यात रेवंडी श्री देवी भद्रकाली व धामापूर श्री देवी सातेरी या मंदिरांचा समावेश आहे. यातील रेवंडी येथील मंदिरातील चोरी करताना संशयित आरोपी सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत असल्याने त्याच्यापर्यंत मालवण पोलीस पोहोचले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरचा सराईत चोरटा देवगड तालुक्यातील असून तो सध्या जेलमधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुटून आल्याची माहिती मिळालेली आहे. मालवण पोलिसांकडून त्याच्या घरीही जावून तपास करण्यात आला, मात्र तो सापडून आलेला नाही.
दरम्यान, सलगपणे दोन मंदिराच्या फंडपेटय़ा फोडण्यात आल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंदिरातील फंटपेटय़ांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा समोर आला आहे.
रेवंडी गावचे ग्रामदैवत श्री देवी भद्रकाली मंदिरातील येथील फंडपेटीला चोरटय़ांनी लक्ष्य केले. फंडपेटीतून 300 ते 400 रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे देवस्थान कमिटीने पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली मंदिरात गेल्या पाच वर्षात तिसऱयांदा चोरटय़ांनी फंडपेटी फोडली आहे. दोन वर्षांपूर्वी चोरटय़ांनी येथील फंडपेटय़ांना लक्ष्य केले होते. मंदिर आणि परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने चोरटय़ांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही चोरी 26 मार्च रोजी झाली होती. यानंतर धामापूर तलावाशेजारी असलेल्या देवी भगवती मंदिरातील दानपेटी 1 जून रोजी उशिरा चोरटय़ांनी कोयता, टिकाव आणि पहारीच्या सहाय्याने फोडून पेटीतील रोख दहा हजार रुपये लंपास केले. दरवाजाचे कुलूप तोडून खाली टाकलेले त्यांच्या निदर्शनास आले. या दोन चोऱयांमुळे इतरही मंदिरातील फंडपेटय़ांबाबत देवस्थान कमिटय़ांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दोन्ही चोऱया सारख्याच प्रकारच्या
चोरटय़ांनी दोन्ही चोऱयांमध्ये वापरलेली कला ही एकसारखीच आहे. यामुळे या दोन्ही चोऱया एकाच चोरटय़ाने किंवा एकाच समुहाने केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मध्यरात्री या चोऱया केल्या गेल्या आहेत. दोन्ही ठिकाणी टिकावचा आणि पहारीचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.
चोरटय़ाचा सुगाव, मात्र तो सटकला
रेवंडी येथील चोरीमध्ये चोरटय़ाचा चेहरा स्पष्टपणे पोलिसांना दिसून येत आहे. यामुळे पोलिसांकडून संबंधित चोरटय़ाचा शोध घेण्यात येत आहे. सदरच्या चोरटय़ाचा चेहरा देवगडमधील एका सराईत चोरटय़ाच्या चेहऱयाशी मिळत असल्याने पोलिसांकडून त्याच्या घरातही चौकशी करण्यात आलेली आहे. संबंधित चोरटा काही दिवसांपूर्वीच जेलमधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुटून आलेला असून घरात आलेलाच नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे पोलिसांच्या अडचणीत भर पडली आहे. मालवणचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात येत आहे.