गणपत गल्ली येथील घटना, चोरी प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या पोलीस पथकाने सराफाकडे केली दागिन्यांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
चोरी प्रकरणांच्या तपासासाठी बेंगळूरहून बेळगावात आलेल्या पोलिसांच्या एका पथकाने गणपत गल्ली येथील सराफी व्यावसायिकाकडे दागिन्यांची मागणी करताच त्याने ऍसिड प्राशन केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेनंतर सराफी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद करून पोलिसांचा निषेध नोंदविला.
महाबळेश्वर शेजेकान (वय 68) असे त्या सराफी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर सराफी व्यावसायिकांत एकच खळबळ माजली आहे.
घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी खासगी इस्पितळाला भेट देऊन त्या सराफाच्या प्रकृतीची विचारपूस केली. यासंबंधी रात्री उशिरापर्यंत मार्केट पोलीस स्थानकात कोणत्याही प्रकारची नोंद झाली नाही. डॉक्टरांनी परवानगी देताच संबंधित सराफाची जबानी घेतली जाईल, असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार केए 04 एमके 9699 क्रमांकाच्या इनोव्हामधून बेंगळूर येथील सिद्धापूर पोलिसांचे एक पथक चोरी प्रकरणाच्या तपासासाठी बेळगावला आले आहे. हुबळी येथील एका जोडगोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांनी बेंगळूर येथे चोरलेल्या दागिन्यांची विक्री बेळगावात केल्याची कबुली दिल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी बेंगळूर पोलीस बेळगावात आल्याचे सांगण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धापूर पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी व त्यांच्या पथकातील इतर साध्या वेशातील पोलीस गणपत गल्ली येथील व्यंकटेश्वर ज्वेलरी वर्क्स या सराफी दुकानात दाखल झाले.
त्यावेळी महाबळेश्वर आपल्या दुकानात होते. पोलिसांनी आरोपींना दाखवत या दोघा जणांनी चोरीचे दागिने तुमच्याकडे विकले आहेत, ते परत करा, अशी मागणी केली.
बेंगळूर पोलिसांनी दागिन्यांची मागणी करताच महाबळेश्वर यांनी ऍसिड पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. तातडीने त्यांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले. यासंबंधीची माहिती सराफी व्यावसायिकांत पसरताच दुपारी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून पोलिसांचा निषेध केला. बेंगळूर पोलिसांचे पथक अद्याप बेळगावात तळ ठोकून आहे.