प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव येथील सराफ स्वप्नील वाळके यांच्या खून प्रकरणासंबंधी सध्या अटकेत असलेला बोंदीर, सांताप्रुझ, तिसवाडी येथील ओंकार मारुती पाटील (30) याला न्यायालयाने जामीन नाकारला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश चोलू गावस यांच्या न्यायालयाने वरील संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. कट कारस्थान रचून खून करणे, पुरावा नष्ट करणे तसेच शस्त्रास्त्र कायद्याखाली या संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
या खून प्रकरणी प्रस्तुत आरोपीचा हात नसल्याचे आरोपीच्या वकिलाने न्यायालयात युक्तीवाद केला. 2 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी हा खून करण्यात आला होता आणि त्यावेळी घटनास्थळी आरोपी पाटील नव्हताच असेही आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला आणि म्हणून त्याला जामिनावर सोडण्यात यावे अशी न्यायालयाकडे विनंती केली.
या खून पकरणातील आरोपी मुश्ताफा शेख असून त्याच्याभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. या प्रकरणातील इतर दोन आरोपींचा ओंकार पाटील हा मित्र असल्यामुळेच पोलिसांनी आरोपीला (ओंकार पाटील) या प्रकण्रात गोवविलेले आहे. या आरोपीकडून पोलिसांनी फक्त नंबरप्लेट जप्त केलेली आहे. याशिवाय आणखी काही नाही असेही आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले आणि अटी घालून आरोपीला जामिनावर सोडण्याची विनंती केली.
सरकारपक्षाचे वकील डी. कोरगावकर यांनी आरोपीला जामिनावर का सोडू नये यावर युक्तीवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या खून प्रकरणाचे एकंदर स्वरुप पाहून आरोपी ओंकार पाटील याचा जामीन अर्ज फेटाळला.