वृत्तसंस्था/ टॉरंगा
बे ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराच्या सोमवारी दुसऱया दिवशी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टेंट बोल्टने प्रकृती नादुरूस्तीमुळे माघार घेतली आहे. खबरदारी म्हणून बोल्टने या सराव प्रशिक्षण शिबिरातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
सदर प्रशिक्षण शिबीर 24 जुलैपर्यंत असून बोल्टची प्रकृती पुन्हा लवकर सुधारेल आणि तो या शिबिरात मंगळवारी तिसऱया दिवशी दाखल होईल, अशी आशा न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने व्यक्त केली. या शिबिरात 8 षटकांची गोलंदाजी केल्यानंतर बोल्टची दमछाक झाल्याचे जाणवले. क्रिकेट न्यूझीलंडने सध्या आपल्या पुरूष आणि महिला संघातील क्रिकेटपटूंसाठी नॉर्थ आयलँड येथे सराव शिबीर सुरू केले आहे. पुरूष संघासाठी आयोजिलेल्या प्रशिक्षण शिबिरातील पहिल्या टप्यामध्ये आठ क्रिकेटपटूंनी आपला सहभाग दर्शविला होता. टेलर, बोल्ट, ग्रॅण्डहोम, सँटेनर, जीत रावल, सिफर्ट, साऊदी आणि वेग्नर यांनी भाग घेतला होता. या प्रशिक्षण शिबिरातील दुसरा टप्पा सहा दिवसांचा असून यामध्ये फर्ग्युसन, ग्युप्टील, जेमीसन, निशम, सॉमरविले आणि यंग हे सहभागी होणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिरासाठी क्रिकेटपटूंचे दोन गट करण्यात आले आहे. महिला क्रिकेटपटूंसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात सात क्रिकेटपटूंनी भाग घेतला आहे.