मतदान सत्ताधाऱयांसाठी की विरोधकांना? : एकूण 40 जागांसाठी 301 उमेदवारांचे भवितव्य ‘इव्हिएम’मध्ये बंदिस्त,तब्बल 25 दिवसांनंतर 10 मार्च रोजी मतमोजणी
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य विधानसभेच्या एकूण 40 जागांसाठी काल सोमवारी सरासरी 80 टक्के मतदान झाले असून सुमारे 301 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात (इव्हिएम) बंदिस्त करण्यात आले आहे. बरोबर 25 दिवसांनी म्हणजे 10 मार्च रोजी मतमोजणी होणार असून त्यांचे भाग्य खुलणार आहे आणि 40 आमदार निवडून येणार आहेत. त्यानंतर नवीन सरकारची स्थापना होणार आहे. मतदारांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवारास कौल दिला आहे ते मतमोजणीनंतरच उघड होणार आहे.
निवडणुकीस मतदारांनी उदंड प्रतिसाद दिला. रांगा लावून मतदान केल्याचे समोर आले असून त्याचा लाभ कोणत्या पक्षाला किंवा उमेदवारास होणार यासाठी 10 मार्चची प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही मतदारसंघात मतदारांनी बदलासाठी मतदान केल्याचे संकेत मिळत असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल मिळण्याची चिन्हे मतदानातून दिसत आहेत. कोरोना संसर्ग व संकटाचा कोणताही प्रभाव या निवडणुकीत दिसून आला नाही. मतदारांनी मोठय़ा उत्साहाने घराबाहेर पडून मतदान केल्याचे चित्र दिसून आले. किरकोळ तक्रारी वगळता कोणताही अनुचित प्रकार न होता मतदान शांततेत पार पडले.
दुपारपर्यंत साठ टक्के मतदान
राज्यातील 40 मतदारसंघातील सर्व म्हणजे 1722 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु झाले. तत्पूर्वी राजकीय पक्ष प्रतिनिधींसमोर मतदानाची रंगित तालीम (मॉक पोल) घेण्यात आली. सर्व मतदान यंत्रणा नीट चालते की नाही याची तपासणी करण्यात आली. पहिल्या दोन तासात म्हणजे 7 ते 9 या कालावधीत सरासरी 11.04 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुढील दोन तासात म्हणजे सकाळी 11 वा. पर्यंत सुमारे 26.63 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी 1 वा. पर्यंत 44.62 टक्के मतदाराची नोंद झाली होती. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत 60.18 टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी 5 वा. पर्यंत 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
सायंकाळी 6 वा. पर्यंत मतदान करण्याची मुभा होती, तथापि काही मतदान केंद्रावर सायंकाळी त्याच वेळेला अनेक मतदार आल्यामुळे 6 वाजल्यानंतर सर्व मतदारांचे मतदान संपेपर्यंत प्रक्रिया चालू ठेवावी लागली. सर्व मतदान केंद्रावर तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानासाठी नेमलेल्या कर्मचारी, अधिकारी वर्गाने त्यांच्या केंद्रावरील मतदान यंत्रे व सामुग्री संबंधित तालुका स्तरावरील केंद्रात जमा केली.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक 88 टक्के मतदान
गोवा विधानसभेसाठी झालेले भरघोस मतदान पहाता जनतेने प्रस्तापितांविरुद्ध कौल दिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. परंतु प्रत्यक्ष निकालानंतरच म्हणजे 10 मार्च रोजी खरे खोटे काय ते कळणार आहे. काँग्रेस, भाजप, आप, तृणमूल, मगोप अशा सर्व प्रमुख पक्षांनी निवडणुकीतील विजयाचे स्पष्ट बहुमताचे दावे केले असून प्रस्तापित घरी बसतील व नवे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात 88 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले असून तेथे मतदार बदल घडवणार अशी चर्चा मतदारांमध्ये आहे.
दोन राज्यपालांकडून मतदान
गोव्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा दोन राज्यपालांनी मतदान केले. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी ताळगाव मतदारसंघातील दोनापावला येथील सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर पत्नी रिटा श्रीधरन पिल्लई यांच्यासह मतदान केले. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे मतदान करण्यासाठी मुद्दाम गोव्यात आले आणि त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे पवित्र कार्य असून लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. म्हणून सर्वांनी मतदान करावे आणि ते 100 टक्के व्हावे म्हणून प्रयत्न करा, असे आवाहन आर्लेकर यांनी केले.