पटाखा फेम अभिनेत्रीची आपबीती
अभिनेत्री राधिका मदनची बॉलिवूड कारकीर्द प्रारंभिक अवस्थेत आहे. पण स्वतःच्या दमदार अभिनयाच्या बळावर तिने कमी काळात चांगले नाव कमाविले आहे. पण बॉलिवूडमधील तिचा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील अनेक गुपिते मांडली आहेत.
चित्रपटांमध्ये भूमिका मिळविण्याचा प्रयत्न करत असताना अनेकांनी नायिका होण्यासाठी आकर्षक शेप आणि साइजसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नाही तर सर्जरी करण्यासाठी देखील सांगितले होते. पण मी योग्य असल्याचे मला वाटत होते. मी सुंदर नाही असे सांगणारे हे लोक कोण असा प्रश्न मी नेहमीच स्वतःला विचारला असे ती सांगते.
प्रयत्न करूनही दीड वर्षापर्यंत मला काम मिळाले नाही. अशा काळात स्वतःच्या क्षमतेवर संशय वाटू लागणे स्वाभाविक असते. पण प्रवास नव्हे तर लक्ष्य महत्त्वाचे असते हे मी जाणून होते. ऑडिशनमध्ये सातत्याने उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यानंतर पहिला चित्रपट मिळाला, पुढे चित्रपट मिळत गेल्याचे राधिकाने मुलाखतीत म्हटले आहे.
राधिकाने विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. त्यानंतर ‘मर्द को दर्द नहीं होता’ चित्रपटात तिने काम केले. ‘इंग्लिश मीडियम’मध्येही तिने महत्त्वाची भूमिका साकारली.