वृत्तसंस्था/ सार्दिनिया
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील सार्दिनिया खुल्या क्लेकोर्ट पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या लेस्लो डिजेरने एकेरीचे जेतेपद मिळविताना इटलीच्या सेचिनॅटोचा पराभव केला. डिजेरचे एटीपी टूरवरील हे दुसरे जेतेपद आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात डिजेरने सेचिनॅटोचा 7-6 (7-3), 7-5 असा पराभव केला. पुरूष टेनिसपटूंच्या मानांकन यादीत डिजेर 74 व्या स्थानावर आहे. 2020 च्या टेनिस हंगामात एटीपी टूरवरील स्पर्धा जिंकणारा डिजेर हा सर्बियाचा तिसरा टेनिसपटू आहे. चालू वर्षीच्या टेनिस हंगामात सर्बियाच्या जोकोविच आणि केमानोव्हिक यांनी स्पर्धा जिंकल्या आहेत.