वृत्तसंस्था / पॅरीस
सर्बियाचा टॉप सीडेड पुरूष टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने टेनिस क्षेत्रातील मानांकनात सर्वाधिक कालावधीत अग्रस्थान राखण्याचा नवा विश्वविक्रम नोंदविला आहे. जोकोविचने पुरूष एकेरीच्या एटीपी मानांकनातील आपले अग्रस्थान सलग 311 आठवडे राखले असून त्याने स्वीसच्या रॉजर फेडररचा यापूर्वीचा विश्वविक्रम मागे टाकला आहे.
33 वर्षीय जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत 18 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. स्वीसचा 39 वर्षीय रॉजर फेडररने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत विक्रमी 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदांचा विक्रम केला आहे. त्याचप्रमाणे स्पेनच्या माजी टॉप सीडेड राफेल नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 20 प्रमुख अजिंक्यपदे मिळविली आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये जोकोविचने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. आता जोकोविच, नदाल आणि फेडरर या तीन अनुभवी टेनिसपटूमध्ये विविध विक्रमांसाठी यापुढे चुरस पाहावयास मिळेल.
सर्बियाच्या जोकोविचने यापूर्वी दोन वेळा एटीपीच्या मानांकनात 88 आठवडे आपले अग्रस्थान राखले होते. 2020 च्या फेब्रुवारीमध्ये जोकोविचने एटीपी क्रमवारीतील अग्रस्थान पुन्हा काबीज केले आणि त्याने वर्षअखेरपर्यंत आपले हे अग्रस्थान कायम राखले. अमेरिकेच्या पीट संप्रासने वर्षअखेरीस आपले अग्रस्थान आतापर्यंत सहा वेळा राखण्याचा विक्रम केला आहे. 2005 च्या जुलैमध्ये सर्बियाच्या जोकोविचने एटीपीच्या मानांकनात पहिल्या 100 टेनिसपटूमध्ये पदार्पण केले होते. 2006 जूनमध्ये जोकोव्हिकने एटीपी मानांकनातील पहिल्या 50 टेनिसपटूमध्ये स्थान मिळविले. 2007 च्या मार्चमध्ये त्याने एटीपीच्या मानांकनात पहिल्या 10 टेनिसपटूमध्ये प्रवेश केला होता. 2011 च्या 4 जुलै रोजी आपल्या वयाच्या 24 व्या वर्षी जोकोविचने पहिल्यांदा मानांकनातील अग्रस्थान मिळविले होते. जोकोविचने 2016 च्या टेनिस हंगामात 100 दशलक्ष डॉलर्सची कमाई करणारा पहिला टेनिसपटू ठरला होता. फेडरर आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये झालेल्या 50 लढतीत जोकोविचने 27 तर फेडररने 23 लढती जिंकल्या आहेत. उभय टेनिसपटूमधील 2019 सालातील विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील अंतिम सामना ऐतिहासिक ठरला होता.