एटीपी चषक टेनिस : जोकोविच, नदालचे सामने ठरले निर्णायक
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
सुपरस्टार टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने केलेल्या कामगिरीच्या जोरावर सर्बियाने चिलीचा 2-1 असा पराभव करून पहिल्या एटीपी चषक टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. नदालच्या स्पेननेही उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे.
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमच्या तयारीसाठी ही आदर्श स्पर्धा असल्याचे जोकोविचने नंतर सांगितले. राऊंडरॉबिन टप्प्यानंतर सर्बिया संघ अपराजित राहिला आहे. जोकोविचने आतापर्यंत तीनही एकेरीचे सामने जिंकले असून चिलीच्या क्रिस्तियन गॅरिनला त्याने 6-3, 6-3 असे हरवित ही लढत जिंकून दिली. त्याआधी डुसान लॅजोविचने निकोलस जॅरीचा 6-2, 7-6 (7-2) असा पराभव केला होता. जॅरी व अलेजांड्रो टॅबिलो यांनी दुहेरीचा सामना जिंकून चिलीला एकमेव यश मिळवून दिले. त्यांनी सर्बियाच्या व्हिक्टर ट्रॉयकी व निकोला कॅसिच यांचा 6-3, 7-6 (7-2) असा पराभव केला.
सर्बियाची उपांत्यपूर्व लढत सिडनीत आठव्या मानांकित संघाविरुद्ध होणार आहे. सर्बियन प्रेक्षकांचा तेथे ब्रिस्बेनपेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल, अशी आशा जोकोविचने व्यक्त केली. अन्य एका लढतीत स्पेनने जपानचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 36 अनियंत्रित चुका होऊनही नदालने जपानच्या निशिओकाचे कडवे आव्हान 7-6 (7-4), 6-4 असे मोडून काढत स्पेनला पुढील फेरीत नेले. स्पेनही या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिले आहे.