वार्ताहर /सांबरा
नागरिकांनी झाडाखाली व रस्त्याकडेला टाकलेल्या देवदेवतांच्या प्रतिमांचे सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्यावतीने संकलन करण्यात आले. रविवारी सकाळी एअरपोर्ट रोड सांबरासह मुतगा, निलजी, एस. सी. मोटर्स येथील प्रतिमांचे संकलन करण्यात आले. घरातील नको असलेले देवदेवतांचे जुने फोटो नागरिकांकडून नेहमीच एखाद्या झाडाखाली किंवा रस्त्याकडेला टाकले जातात. त्यामुळे आपल्याच देवदेवतांची विटंबना होत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी सर्वलोक सेवा फाऊंडेशनने असे फोटो संकलन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रारंभी सांबरा येथे प्रतिमांचे संकलन करण्यात आले. याप्रसंगी सर्वलोक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठसह श्रीकांत कदम, महादेव रेडेकर, संतोष हिरेमठ, देवाप्पा कांबळे, मंजुनाथ वन्नूर, राहुल गावडे, विनायक परीटसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मुतगा, निलजी, एस. सी. मोटर्स व शहरातील रेस कोर्स, हनुमाननगर व हिंडलगा गणपती मंदिर येथील प्रतामांचे संकलन करण्यात आले. प्रेम व काच बाजूला करून फोटोंचे विधीवत होमहवन करून देवदेवतांच्या फोटोंची विटंबना टाळण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी असे देवदेवतांचे जुने फोटो असतील तर सर्व लोकसेवा फाऊंडेशनशी संपर्क साधून फोटो आणून देण्याचे आवाहन हिरेमठ यांनी केले आहे.