केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांची माहिती : देशवासियांना दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी दिली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणीदेखील होऊ लागली आहे. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावरून दिसून येत आहे.
ओडिशाचे अन्न पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री आर. पी. स्वॅन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय पशुपालन, डेअरी, मत्स्य, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री प्रताप सारंगी यांनी “सर्व भारतीयांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे,’’ असे स्पष्ट केले. स्वॅन यांनी यापूर्वीही मोफत लस देण्याची आग्रही मागणी केली होती. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप सारंगी यांच्याकडे उत्तर मागितले होते.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राज्यात मोफत कोरोनाची लस देण्याची घोषणा जाहीरनाम्यामधून केली होती. या घोषणेवरून विविध पक्षाच्या नेत्यांनी भाजपला टार्गेट करत संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत देण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘कृपया तुमच्या राज्यातील निवडणुकीची तारीख पाहा. जेथे निवडणुका असतील तेथेच फक्त लोकांना कोरोनाची मोफत लस मिळणार आहे.’ असा टोला मारला होता. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “बिहारमध्ये मोफत लस, मग उर्वरित भारत काय बांगलादेशात आहे का?’’ असा प्रश्न उपस्थित केला होता.
पुढील आठवडय़ापासून ब्रिटनमध्ये लसीकरण ?
लंडनमधील महत्त्वाच्या रुग्णालयातील कर्मचाऱयांना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकाने विकसित केलेल्या लसीची पहिली खेप स्वीकारण्यासाठी तयार रहा, असे सांगण्यात आले आहे. या घोषणेमुळे लवकरच ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात होण्याचे संकेत मिळाले आहेत. ‘द सन’ या स्थानिक वर्तमानपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे. ही लस कोरोना व्हायरसची साथ संपवण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या दोन नोव्हेंबरपासून म्हणजेच पुढच्या आवठडय़ापासून कोरोना लसीसाठी तयार राहा, असे ब्रिटनमधील महत्त्वाच्या रुग्णालयांना सांगण्यात आले आहे. ऑक्सफर्डची लस भारतासह जगातील अनेक देशात मानवी चाचणीच्या तिसऱया टप्प्यात आहे. भारतात सिरम इन्स्टिटय़ूट या लसीचे ‘कोविशिल्ड’ या नावाने उत्पादन करत आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली लस कोरोना व्हायरस विरोधात गेमचेंजर ठरु शकते.