जगातील सर्वात महागडय़ा औषधाची किंमत किती असेल? ही आपल्या कल्पनेच्याही बाहेरची म्हणजे 21 लाख डॉलर्स (साधारणतः 16 कोटी रुपये) इतकी आहे. या औषधाचे उत्पादन अत्यंत मर्यादित असून विशिष्ट व्याधी असणाऱया बालकांनाच ते दिले जाते. चीनमधील दीड वर्षाचे बालक युआन याच्यासाठी ते नुकतेच तयार करण्यात आले असून या बालकाला विचित्र व्याधीचा सामना करावा लागत आहे. हे बालक बसू शकत नाही. तसेच कुठलाही पदार्थ गिळू शकत नाही. त्याच्या स्वरयंत्राचे स्नायू अतिशय कमजोर असल्याने ते बोलण्याचा प्रयत्नही करू शकत नाही. त्याला केवळ रडता येते आणि तेही मोठय़ा कष्टाने.
या बालकाला एसएमए टाईप-1 हा आजार आहे. जन्माच्या वेळी तो नव्हता. नंतर त्याची लागण झाली आहे. आता यावर हे महागडे औषध हा एकच उपाय असल्याचे त्याचे डॉक्टर्स म्हणतात. त्याच्या माता-पित्यांची परिस्थिती स्वबळावर हे महागडे औषध विकत घेण्याची नाही. त्यामुळे त्यांनी दानशूर व्यक्तींना आपल्या अपत्याचा जीव वाचविण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.