जर्मनीत दाढी-मिशी स्पर्धा 2021 चे आयोजन झाले आहे. या स्पर्धेबद्दल लोक विशेष उत्साही दिसून आले. जर्मनीसह नेदरलँड्स, इटली, स्वीत्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि इस्रायलमधील लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
या स्पर्धेत भाग घेतलेले लोक स्वतःच्या मोठमोठय़ा मिशा आणि दाढीसह पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धक कुणाकडे सर्वात चांगली मिशी आणि दाढी आहे हे जाणून घेण्यासाठी जर्मनीत येतात. जर्मनीच्या एगिंग भागात ही स्पर्धा पार पडली असून यात 100 स्पर्धकांनी भाग घेतला आहे.
ऑस्ट्रियामधून नॉर्बर्ट डोप देखील जर्मनीतील मिशी-दाढी स्पर्धेत सहभागी झाले. त्यांची वेशभूषा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. नैसर्गिक मिशा, ट्रिम करविलेली दाढी-मिशी अशा विविध प्रकारच्या स्पर्धा होत्या. तसेच स्वतःच्या केसांना जेल न लावणाऱयांचीही स्पर्धा होती.
जर्मनीतील ईस्ट बावरियन बियर्ड अँड मस्ताशे क्लब या स्पर्धेचे आयोजन करविते. दाढीची देखभाल सर्वात आवश्यक गोष्ट असते, हीच देखभाल पडताळून पाहण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे क्लबचे अध्यक्ष क्रिस्टियान फिच यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेत कुणीही भाग घेऊ शकत होता. पण स्पर्धा जिंकण्यासाठी जर्मन मस्ताशे क्लबचा सदस्य असणे किंवा जर्मनीचा नागरिक असणे आवश्यक आहे. विजेत्याची निवड करण्यासाठी 7 परीक्षकांची समिती स्थापन करण्यात आली होती. हे परीक्षक केस कापणे आणि त्यांची स्टाइल करण्याचे तज्ञ होते. या स्पर्धेत विविध देशांमधून आलेल्या सुमारे 100 जणांनी भाग घेतला आहे.