जगातील सर्वात मोठे जहाज तयार करण्याचे नियोजन अत्यंत वेगाने पुढे जात आहे. या सुपरयाटमध्ये 6 मजले आणि 39 अपार्टमेंट्स असणार आहेत. प्रत्येक अपार्टमेंटची किंमत 11 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 81 कोटी रुपयांच्या आसपास असू शकते.
या 728 फूट लांबीच्या सुपरयाटचे नाव सोमनियो आहे. 2024 मध्ये हे जहाज लाँच करण्याची तयारी सुरू आहे. सोमनियोच्या निर्मितीकरता सुमारे 600 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 44 अब्ज रुपयांचा खर्च येणार आहे.
सद्यकाळात जगातील सर्वात लांब सुपरयाट अज्जाम आहे. पण ही केवळ 600 फूट लांबीची आहे. सोमनियोच्या माध्यमातून लोक जगातील सर्वात मोठय़ा याटचा आनंद घेऊ शकतील तसेच तेथे असलेल्या लक्झरी अपार्टमेंट्समध्ये अनेक उत्तम सुविधाही मिळणार आहेत.
विशेष बाब म्हणजे लोक या अपार्टमेंट्सना खरेदी करू शकणार आहेत. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये स्वतंत्र जिम असणार आहे. याचबरोबर या अपार्टमेंट्समध्ये वाचनालय, किचन आणि डायनिंग स्पेसही मिळणार आहे.
या प्रकल्पाचे प्रमुख कार्ल ले साउफ आहेत. ते सोमनियो ग्लोबलचे प्रभारी देखील आहेत. सोमनियो सारख्या विशाल आकाराच्या बोटीला स्वीडिश डिझाइन कंपनी टिलबर्ग डिझाइन आणि लंडनमधील कंपनी विंच डिझाइनने मिळू तयार केले आहे.
सोमनियोमध्ये अपार्टमेंट खरेदी करणाऱयांना एका खासगी जहाजावर फिरण्याचा अनुभव प्राप्त होणार आहे. याचबरोबर अनेक लोकांना भेटण्याचा आणि नेटवर्किंग वाढविण्याची संधीही मिळणार आहे.
सोमनियोमध्ये जागतिक दर्जाची वैद्यकीय सुविधा असणार आहे. याचबरोबर अपार्टमेंटच्या मालकांना महामारींपासून पूर्ण सुरक्षा देण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वप्रकारच्या जागतिक जोखिमीसंबंध्घ काळजी या याटमध्ये घेतली जाणार आहे.
सोमनियोची निर्मिती नॉर्वेमध्ये होत आहे. ऑफ प्लॅन सेलच्या मदतीने या प्रकल्पाला आर्थिक मदत मिळणार आहे. यातून ही महाकाय आकाराची याट तयार करण्याचे काम केले जात आहे.