पीएमव्ही इलेक्ट्रिक इएएस-ई मॉडेलचा समावेश : चार्जिंगवर 200 किमी धावणार कार
मुंबई : मुंबईतील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक पीएमव्ही इलेक्ट्रिकने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार इएएस-इ लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 4.79 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र, पहिल्या 10 हजार ग्राहकांसाठी ही किंमत कायम राहणार आहे. ही ई-कार मायक्रो श्रेणीतील आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 75 पैसे प्रति किमी खर्च येणार असल्याचाही दावा केला आहे.
या कारमध्ये 10 केडब्लूएच इतक्या क्षमतेची लिथियम फॉस्फेट बॅटरी वापरली आहे, जी सुमारे 20 एचपी पॉवर निर्माण करण्यास सक्षम राहणार असल्याचेही सांगितले आहे. या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतील आणि ही कार एका चार्जमध्ये 120 ते 200 किलोमीटरचे अंतर पूर्ण करु शकणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
2,000 रुपयामध्ये बुकिंग सुविधा
कंपनीने अधिकृतपणे या छोटय़ा कारचे प्री-बुकिंग देखील सुरू केले आहे, ज्याकरीता ग्राहकांना फक्त 2,000 रुपये भरुन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून कार बुक करण्याची सुविधा असेल.