आत्मनिर्भर भारत : चाचण्यांचा खर्च कमी होणार, 3 तासांत अहवाल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगभरात सर्वत्र कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या महामारीदरम्यान आवश्यक ठरलेल्या चाचणीचे दर अद्याप सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. कोरोना चाचणीचे हे महागडे दर लक्षात घेत केंद्र सरकारने बुधवारी जगातील सर्वात स्वस्त कोरोना टेस्ट किट सादर केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि राज्यमंत्री संजय धोत्रे या दोघांनी मिळून दिल्ली आयआयटीने विकसित केलेल्या कोरोना टेस्ट किटचे सादरीकरण केले आहे.
हे टेस्ट किट लवकरच स्वस्त दरात बाजारात उपलब्ध केले जाणार असून यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण आणि खर्च या दोन्ही प्रकरणी देशाला या किटमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे उद्गार आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी काढले आहेत. आयआयटी दिल्लीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत न्यूटेक मेडिकल डिव्हायसेस कंपनी या किट्सचे उत्पादन करणार आहे.
700 रुपये राहणार किंमत
आयआयटी दिल्लीनुसार हे देशातील सर्वात स्वस्त टेस्ट किट ठरणार आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या टेस्ट किटची किंमत केवळ 399 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु बाजारपेठेत पोहोचेपर्यंत या किटची किंमत 700 रुपयांच्या आसपास राहणार आहे. हे टेस्ट किट विदेशी उपकरणांच्या तुलनेत स्वस्त असण्यासह प्रभावी देखील आहे. या टेस्ट किट्सच्या मदतीने दर महिन्याला 20 लाख चाचण्या करता येणार आहेत.