कणगले ग्रा.पं.मध्ये मतदानाचा टक्का घसरला : आकडेमोड सुरू
वार्ताहर / हुक्केरी, कणगला
हुक्केरी तालुक्यात 51 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. 272 मतदार केंद्रांमधील बेल्लद बागेवाडी ग्रा. पं. निवडणूक बिनविरोध पार पडल्याने मतदान प्रक्रिया झाली नाही. तालुक्यात एकूण 2,46,191 मतदार असून यामध्ये 1,23,144 पुरुष व 1,23,047 महिला मतदार आहेत. यापैकी 2,07,540 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1,04,197 पुरुष तर 1,03,343 महिलांनी आपले मतदान केले. यामुळे एकूण 84.30 टक्के मतदान झाले. सर्वाधिक जास्त मतदान हेब्बाळ ग्रामपंचायतमध्ये 95.11 टक्के झाले. 899 मतदारांपैकी 855 मतदारांनी आपला हक्क बजावला. तसेच अम्मणगीमध्ये 94.63 टक्के, बुगटेआलूर व हडलगामध्ये 94.62 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी हुन्नूर येथे 59.36 टक्के झाले.
कणगलेतील मतदान टक्केवारीत घसरण
हिटणी, बाड पंचायतीचे मतदान 88 टक्के तर कणगले येथे 81 टक्के मतदान झाले. हिटणी, शिप्पूर 3810 पैकी 3374 मतदान, बाड, बाडवाडी व करजगा येथे 5730 पैकी 5060 तर कणगले 5883 पैकी 4794 मतदान झाले. यावरुन मतदान टक्केवारीत कणगले ग्रामपंचायतीची घसरण झाली आहे. यावर हिटणी, बाड पंचायतीने विकास करण्यात बढत घेतल्याचे मतदानावरून दिसत आहे. तर करजगा येथे शेतीवाडीतील वसाहतीत सीसी रस्ते, पेव्हरब्लॉक नाही, अतिवृष्टीने शेतीरस्ते खराब, नरेगामधून रस्ते सुधारणासाठी प्रयत्न नाहीत. भवानीनगरात पावसाचे पाणी कॉलनीत शिरले. याबद्दल पंचायत सदस्य, पंचायत विकास अधिकाऱयांना कळवूनदेखील दखल घेतली नाही. याचाच परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारी घसरली आहे.
कणगला येथे वॉर्ड नं. 1 मध्ये 1086 पैकी 916, वॉर्ड नं. 2 मध्ये 986 पैकी 612, वॉर्ड नं. 3 मध्ये 824 पैकी 692, वॉर्ड नं. 4 मध्ये 1170 पैकी 959, वॉर्ड नं. 6 मध्ये 964 पैकी 753 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कणगले ग्रा. पं. तीत एकूण 5853 पैकी 4796 मतदारांनी मतदान केले असून, 81.92 टक्के मतांची टक्केवारी पहावयास मिळते. तर शिप्पूर आणि हिटणीमध्ये वॉर्ड नं. 1 मध्ये 772 पैकी 642, वॉर्ड नं. 2 मध्ये 1192 पैकी 1024, वॉर्ड नं. 3 मध्ये 1032 पैकी 929, वॉर्ड नं. 4 मध्ये 914 पैकी 876 असे मतदान झाले. एकूण 3810 पैकी 3374 मतदारांनी हक्क बजावला. तर बाड, बाडवाडी व करजगा याठिकाणी वॉर्ड नं. 1 मध्ये 160 पैकी 956, वॉर्ड नं. 2 मध्ये 1010 पैकी 907, वॉर्ड नं. 3 मध्ये 899 पैकी 855, वॉर्ड नं. 4 मध्ये 707 पैकी 590, वॉर्ड नं. 5 मध्ये 635 पैकी 566, वॉर्ड नं. 6 मध्ये 1420 पैकी 1189 इतक्या जणांनी मतदान केले असून एकूण 5730 पैकी 5050 मतदारांनी हक्क बजावल्याने 88.60 टक्के मतदान झाले.