- 20 ऑगस्टला होणार शिक्षेची सुनावणी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे. भूषण यांनी 2 ट्विट केली होती. एका ट्विट मध्ये सर न्यायाधीश शरद बोबडे हे नागपूर मधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी टिप्पणी केली होती. तर दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी 4 न्यायमूर्तींवर लोकशाही नष्ट करण्यात भूमिका बजावल्याचा आरोप केला होता.
प्रशांत भूषण यांच्या ट्विटची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आज पार पडली. आता त्यांच्या शिक्षेबाबत 20 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, ॲक्ट 1971 नुसार प्रशांत भूषण यांना सहा महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र त्यांनी माफी मागितल्यास कोर्टाकडून त्यांना माफी देखील मिळू शकते, अशी तरतुदी या कायद्यात आहे.