ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालय मधील 9 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी मंजूरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयातील या नऊ न्यायमूर्तींमध्ये तीन महिला न्यायमूर्तींचा समावेश आहे. जे न्यायमूर्ती नियुक्त करण्यात आले आहेत, त्यात बी. व्ही. नागरत्ना यांचा समावेश आहे. पदोन्नती धोरणानुसार सप्टेंबर 2027 मध्ये न्यायमूर्ती नागरत्ना या देशाच्या पहिल्या सरन्यायाधीश होऊ शकतात.
ज्या इतर आठ न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे, यामध्ये नागरत्ना यांच्यासह आणखी दोन म्हणजेच न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती हिमा कोहली या महिला न्यायमूर्ती आहेत. यांच्या नियुक्तीनंतर सुप्रीम कोर्टात आधीच नियुक्त असलेल्या इंदिरा बॅनर्जी यांच्यासह एकूण 4 महिला न्यायाधीश होतील. याशिवाय न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार, न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश, माजी सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जितेंद्रकुमार माहेश्वरी यांचा समावेश आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात 34 न्यायाधीशांची स्वीकृत संख्या आहे. आताफक्त 24 न्यायाधीश आहेत. नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीनंतरही एका न्यायाधीशाची जागा रिक्त राहणार आहे.