रेशनकार्डधारकांसह दुकानदारांमधून नाराजी,मुदतवाढीची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
रेशन कार्डधारकांच्या ई-केवायसीसाठी असणारे सर्व्हर डाऊन झाल्याने ई-केवायसीचे काम ठप्प झाले आहे. दि. 7 जानेवारीपर्यंत सर्व्हर डाऊन राहणार असल्याने कार्डधारकांना पुन्हा वाट पहावी लागणार आहे. डिसेंबर 1 ते 10 पर्यंत ई-केवायसीचे काम सुरळीतपणे चालले. मात्र त्यानंतर जानेवारीमधील कामात सर्व्हर डाऊनचा व्यत्यय येत असल्याने कार्डधारकांसह दुकानदारही वैतागून गेले आहेत. 1 जानेवारीपासून ई-केवायसीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र केवळ चारच दिवस हे काम चालले. त्यातही सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार निर्माण झाली होती.
आता 5 तारखेपासून 7 पर्यंत पुन्हा सर्व्हर डाऊन राहणार असल्याने ई-केवायसीचे काम ठप्प झाले आहे. यामुळे शहरातील बऱयाचशा रेशन दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर 7 जानेवारीपर्यंत ई-केवायसीचे काम बंद राहणार असल्याची पत्रके चिकटवली आहेत. ई-केवायसीसाठी सध्या दुकानांसमोर कार्डधारकांची गर्दी होत आहे. परंतु सर्व्हर डाऊन समस्येमुळे कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. यामुळे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने सर्व्हर डाऊनची समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे. वारंवार ही समस्या निर्माण होत असल्याने कार्डधारकांना तसेच दुकानदारांना बराच त्रास सोसावा लागत आहे. अद्यापही असंख्य रेशनकार्ड धारकांची ई-केवायसी करणे शिल्लक असल्याने मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.