मंगळवार पेठेत ओढा बुजवून प्लाटिंग
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात ओढे मुजवण्याचा कार्यक्रम दरवर्षी सुरु असतो. प्रशासनातील टेबलवर काम करणारे चिरीमिरी घेवून बांधकाम परवाने करण्यास मंजुरी देतात अन् विकसक धुमधडाक्यात काम सुरु करतात. त्याचा फटका पावसाळय़ात बसतो. 501 मंगळवार पेठेत खासगी विकसकाकडून चक्क ओढा बुजवून प्लाटिंगचे काम सुरु आहे. 3 फुटांच्या पाईप टाकून ओढा बुजवण्यात आलेला आहे. याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना देताच कामाची पाहणी करण्यासाठी अभियंता दिलीप चिद्रे यांना पाठवले. परंतु शहर विकास विभागातून कशी मंजूरी दिली त्यावर पालिकेकडून काय कारवाई होणार याचीच चर्चा सुरु आहे.
सातारा शहरात गोडोली परिसरात सुळाच्या ओढय़ावर झालेल्या बांधकामाचा मुद्दा पाठीमागे गाजला होता तसेच मोळाचा ओढा परिसरात ओढय़ाचे पात्रच बदलले गेल्याच्याही तक्रारी झाल्या होत्या. पावसाळय़ात जोराचा पाऊस झाल्यानंतर ओढय़ाचे पात्र बदलल्याचा परिणाम जाणवतो. सातारा शहरात नव्यानेच 501 मंगळवार पेठ भागात गेल्या काही दिवसांपासून वेगाने खाजगी विकसकाचे कामकाज सुरु आहे. नैसर्गिक ओढय़ावर तीन फुटी पाईपा टाकून त्यावर माती टाकून प्लाटिंग करण्याचे काम सुरु आहे. हे काम करत असल्याची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना मिळताच त्यांनी याची पाहणी करण्यासाठी अभियंता दिलीप चिद्रे यांना प्लाटिंगच्या ठिकाणी पाठवले. त्यावेळी हे काम पालिकेचे नाही तर खाजगी असल्याचे समजले. त्यावरुन ते परत आले. परंतु प्लाटिंग करण्यासाठी ओढा बुजवून परवानगी कशी दिली. परवानगी देणाऱयावर नेमकी कोणती कारवाई होणार अशी मागणी होत आहे.
ओढा बुजवून काम करण्यास कशी परवानगी दिली
आज नैसर्गिक ओढय़ाचे पात्र बुजवता येत नाही. ते बुजवून प्लाटिंगला कशी परवानगी दिली गेली आहे. यामध्ये कोणाचे हात ओले झालेत हे तपासून त्यावर कारवाई केली पाहिजे.
वसंत लेवे, नगरसेवक