राज्यसभेत संरक्षणमंत्री राजनाथांचे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाकडे सध्या 11 राफेल लढाऊ विमाने आहेत. मार्चपर्यंत हा आकडा वाढून 17 होणार आहे. या विमानाची संपूर्ण खेप पुढील वर्षी एप्रिलपर्यंत देशाला मिळणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी खासदाराच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल संसदेत सोमवारी म्हटले आहे.
फ्रान्समधून सलग उड्डाण करत 3 राफेल लढाऊ विमाने 27 जानेवारी रोजी रात्री भारतात पोहोचली होती. या 3 लढाऊ विमानांसह आतापर्यंत 11 राफेल विमानांना ताफ्यात सामील करण्यात आले आहे. राफेल विमानांची ही तिसरी तुकडी होती. फ्रान्सच्या इस्ट्रेट्स वायुतळावर उड्डाण केल्यावर 7 हजार किमीपेक्षा अधिक अंतर कापून ही विमाने भारतात दाखल झाली होती.
29 जुलै 2020 रोजी भारताला 5 राफेल विमानांची पहिली तुकडी प्राप्त झाली होती. या विमानांना मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी अंबाला वायुतळावरील एरो स्क्वाड्रनमध्ये सामील करण्यात आले होते. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2020 रोजी आणखीन 3 राफेल विमानांची दुसरी तुकडी देशात पोहोचली होती.