देशातील सर्व नागरिकांसाठी केंद्र सरकार लवकरच एक अनोखी योजना घेऊन येत आहे. पुढील वर्षापासून सरकारशी संबंधित सर्व सोयीसुविधांसाठी एकच पोर्टल तयार करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक नागरिकासाठी एक नॅशनल डिजिटल प्रोफाईल बनविण्यात येत आहे. या एकाच प्रोफाईलला लॉग इन केल्यास सर्व सरकारी सोयी सुविधांचा उपयोग करता येणे शक्य होईल. याशिवाय नागरिकांकडे असणाऱया सर्व आयडीजसाठी एकच आयडीची सुविधाही देण्यात येत आहे. सध्या नागरिकांकडे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट आणि इतर सरकारी ओळखपत्रे असतात. ही सर्व कागदपत्रे सांभाळणे जिकरीचे होऊ शकते. त्यामुळे या सर्व ओळखपत्रांऐवजी एकच सामाईक ओळखपत्र देण्याची योजना सरकारकडून आखली जात आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
सरकार सध्या ई गव्हर्नन्सला प्राधान्य आणि प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेस, प्रॉडक्टस्, डिव्हाईसेस आणि कामाच्या संधी इत्यादींची माहिती लोकांना नेहमी लागते. इलेक्ट्रॉनिक उत्पादने देशातच बनविण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व सरकारी सोयीसुविधा आणि सेवांसाठी सामाईक इको सिस्टिम तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेमध्ये विशेष रस घेतला असून त्यांच्या पुढाकाराने ही योजना साकारत आहे. आयुषमान भारत डिजिटल अभियानाच्या अंतर्गत सर्व नागरिकांना डिजिटल हेल्थ आयडी देण्याचे उत्तरदायित्त्वही या डिजिटल कार्यक्रमावर सोपविण्यात आले आहे.
लवकरात लवकर या डिजिटल प्रोफाईलची निर्मिती केली जाणार आहे. पुढील वर्षापासून ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारी सोयीसुविधा प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत विनासायास पोहोचविल्या जाऊ शकणार आहेत.