आजही मुसळधार पावसाची शक्यता सरासरीपेक्षा 22 इंच जादा विक्रमी नोंद
प्रतिनिधी / पणजी
मुसळधार पावसाने शुक्रवारी पुन्हा गोव्याला झोडपून काढले. राज्यात पडत असलेल्या पावसाची शतकाकडे वाटचाल असून सरासरीच्या तुलनेत यंदा 22 इंच जादा पाऊस पडला आहे. सायंकाळी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पणजीत सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या 9 तासांत तब्बल 2.50 इंच पाऊस झाला. मोसमात पडलेला पाऊस 80 इंच झाला आहे.
सक्रिय मान्सूनने सलग चौथ्या दिवशी गोव्याला झोडपले. शुक्रवारपासून सलग तीन दिवसांकरिता लॉकडाऊन सुरू झालेले आहे. त्यातच शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनतेने घरी बसणेच पसंत केले. दिवसभरात पणजीतच 63 मिमी एवढा पाऊस झाला. राज्याच्या सर्वच भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 3.5 इंच पाऊस सांखळीत झाला. म्हापशात 3 इंच, पेडणे व फोंडय़ात 1.5 इंच, पणजी 2 इंच, जुने गोवे 1 इंच, वाळपई 1.5 इंच, काणकोण 3 इंच, दाबोळी 1.5 इंच, मडगाव 2 इंच, मुरगाव 1.5 इंच, केपे व सांगे प्रत्येकी 2 इंच पाऊस झाला.
पेडणे शतकाच्या उंबरठय़ावर !
आतापर्यंत राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद पेडणे येथे झालेली आहे. तिथे 92 इंच पाऊस झालेला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पेडणे शतक ओलांडण्याची शक्यता आहे. फोंडा 81 इंच, जुने गोवे 85 इंच, सांखळी 85 इंच, वाळपई 77 इंच, काणकोण 82 इंच पाऊस झालेला आहे.
आज, उद्या मुसळधार !
पणजी वेधशाळेने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात जोरदार पावसाळी ढग जमलेले आहेत. ते गोव्याच्या पूर्व दिशेने पुढे सरकत आहेत. वरील काळात राज्यात मुसळधार पाऊस व जोरदार वादळी वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील. किनाऱयावर 4.1 मीटरपर्यंत लाटा थडकतील अज अंदाज आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आलेला आहे.