गेल्या चार दिवसात 1.10 रुपयांनी वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले ??आहेत. नव्या दरांनुसार डिझेल 30 पैशांनी आणि पेट्रोल 25 पैशांनी महाग झाले आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल 102.45 रुपये आणि डिझेल 90.83 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. गेल्या चार दिवसात पेट्रोल 1.10 रुपयांनी आणि डिझेल 1.11 रुपयांनी महाग झाले आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सध्या कच्चे तेल 79 डॉलर प्रतिबॅरलवर आहे. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये कच्चे तेल 80 डॉलरपर्यंत पोहोचले होते. सद्यस्थितीत कच्च्या तेलाचे दर आणखी वाढत गेल्यास पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी भडकू शकतात. चालू वर्षात इंधन दरात 16 ते 18 रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारीच्या प्रारंभी दिल्लीमध्ये पेट्रोल 83.97 रुपये आणि डिझेल 74.12 रुपये प्रतिलिटर होते. आता ते 102.45 रुपये आणि 90.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. म्हणजेच गेल्या 9 महिन्यामध्ये पेट्रोल 18.48 रुपयांनी आणि डिझेल 16.71 रुपयांनी महाग झाले आहे.
26 राज्यांमध्ये पेट्रोल, 6 राज्यात डिझेल शंभरीपार
देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, पाँडिचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्हय़ांमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे आहे. दुसरीकडे, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि राजस्थानमधील बहुतांश जिल्हय़ांमध्ये डिझेल 100 रुपयांपेक्षा महाग झाले आहे.