दिवसभरात 91,702 नवे रुग्ण- 1.34 लाख डिस्चार्ज- 3,403 मृत्यूंची नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग चौथ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या 24 तासात देशात 3,403 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, 91 हजार 702 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 1 लाख 34 हजार 580 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली आहे. म्हणजेच मागच्या दिवसभरात सक्रिय रुग्णसंख्या 46 हजार 281 कमी झाली आहे. देशातील लसीकरणाच्या बाबतीतही सध्या चांगले चित्र दिसत आहे. 10 जूनपर्यंत देशात 24 कोटी 60 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात देशात 32 लाख 74 हजार लसी देण्यात आल्या. लसीकरणाला वेग देण्यासोबतच देशातील आरोग्य यंत्रणांकडून कोरोना चाचण्यांनाही प्राधान्य देण्यात येत आहे.
कोरोनामुळे देशात नियंत्रणाबाहेर जात असणारी परिस्थती मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशात सलग 29 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा संसर्गमुक्त होणाऱयांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत देशात 2 कोटी 92 लाख 74 हजार 823 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 2 कोटी 77 लाख 90 हजार 73 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, देशात आतापर्यंत 3 लाख 63 हजार 79 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 11 लाख 21 हजार 671 इतके सक्रिय रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत.