जागतिक वातावरणाचा प्रभाव ः सेन्सेक्स 361 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील सलग चार सत्रात भारतीय भांडवली बाजाराने आपला प्रवास नकारात्मक केला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने अंतिम दिवसाच्या सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स जागतिक बजारातील वातावरणामुळे नुकसानीत राहिला आहे.
सेन्सेक्स 361 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांपैकी एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएस यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 360.78 अंकांनी प्रभावीत होत 0.61 टक्क्यांनी घसरुन 58,765.58 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 86.10 अंकांनी प्रभावीत होत 0.48 टक्क्यांच्या नुकसानीसह निर्देशांक 17,532.05 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच मारुती सुझुकी, भारती एअरटेल, एशियन पेन्ट्स, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, डॉ.रेड्डीज लॅब, अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग मजबूत राहिले आहेत.
मुख्य घडामोडींचा प्रभाव
जागतिक पातळीवरील संकेतामुळे देशातील शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात शुक्रवारी घसरण राहिली आहे. यामध्ये सार्वजनिक बँका वगळता आयटी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात झालेल्या विक्रीच्या दबावामुळे बाजार नुकसानीत राहिला आहे. तर दुसऱया बाजूला औषध, धातू आणि पीएसयू बँका यांच्या समभागांची खरेदी झाल्याचे दिसून आले आहे. वाहन बाजारात काही वाहन कंपन्यांच्या विक्रीचे आकडे सादर झाले असून यात निफ्टीमधील वाहनांचा निर्देशांक दिवसभरात घसरणीतून नंतर सावरला आहे. यासह गुंतवणूकदारांनी आयटी क्षेत्रात नफा वसुली केली असल्याने बाजार प्रभावीत झाला आहे.
आशियातील शेअर बाजारात टोकीओ आणि सोल नुकसानीत राहिले आहेत. शांघाय आणि हाँगकाँग बाजार बंद होते. युरोपीयन बाजारातील प्रमुख बाजारात दुपारपर्यंत घसरणीचा कल राहिला होता.