नवी दिल्ली
गेल्या तीन दिवसांपासून डिझेलच्या दरात कपात होताना दिसत आहे. रविवारीसलग तिसऱया दिवशी देखील डिझेलच्या दरांमध्ये कपात झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथे डिझेल 14 पैशांनी स्वस्त झाले आहे तर चेन्नईमध्ये 13 पैसे प्रतिलिटरने दर घसरले आहे. देशाची राजधानी दिल्लीत गेल्या तीन दिवसात डिझेलच्या दरात प्रतिलिटर 48 पैशांची घसरण झाली आहे. डिझेल दरात कपात झाली असली तरी पेट्रोल दर मात्र स्थिर राहिले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे डिझेलचे दर अनुक्रमे 70.80 रुपये, 74.32 रुपये, 77.22 रुपये, 76.27 रुपये प्रतिलिटर प्रमाणे आहेत. तर पेट्रोलचे दर 81.06 रुपये, 82.59 रुपये, 87.74 रुपये, 84.14 रुपये प्रतिलिटर इतके आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता निश्चित होत असतात.