बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा कडक निर्बंध राबविण्यात येत आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान कर्नाटकात सलग तीन दिवसांच्या कोरोना रुग्णवाढीनंतर सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली. सलग तीन दिवस राज्यात कोरोनाने ५०० चा टप्पा ओलांडला.
राज्यात सोमवारी ३४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ३२४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५,८२४ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत १२,३३६रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या बेंगळूरमध्येच आहे. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात २१० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर ११० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ४,०९२ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.