नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढत आहे. दुसऱया लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. परंतु, गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशभरात 24 तासात 48 हजार 786 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 1,005 जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 33 कोटी 57 लाख 16 हजार 19 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचा आकडा 40 हजारच्या खाली गेला होता. मंगळवारी 37,566 लोकांना संसर्ग झाल्याची नोंद झाली होती. तर बुधवारी एकूण रुग्णसंख्या 45,951 पर्यंत वाढले होते. आता गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 48 हजार 786 लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. देशात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 88 हजार 918 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 99 हजार 459 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आता देशात 5 लाख 23 हजार 257 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोना लसीचे 33 कोटी 57 लाख 16 हजार 19 डोस देशभरात देण्यात आले आहेत. आतापर्यंत 27 कोटी 60 लाख 99 हजार 880 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 5 कोटी 96 लाख 16 हजार 139 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
देशातील कोरोनास्थिती…
- 24 तासात नवे रुग्ण – 48,786
- 24 तासात डिस्चार्ज – 61,588
- 24 तासातील मृत्यू – 1,005
- सक्रिय रुग्णसंख्या – 5,23,257
- एकूण बाधित – 3,04,11,634
- एकूण डिस्चार्ज – 2,94,88,918
- एकूण मृत्यूसंख्या – 3,99,459
- आतापर्यंत लसीकरण – 33,57,16,019