सेन्सेक्समध्ये 400 तर निफ्टीत 104 अंकांची घट, नफाकमाईचा परिणाम
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ात बुधवारी सलग दुसऱया दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये घट पहावयास मिळाली आहे. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 400.34 अंकांनी घसरून 51,703.83 वर दिवसअखेर बंद झाला. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी दिवसअखेर 104.55 अंकांनी घसरुन दिवसअखेर 15,208.90 वर बंद झाला आहे.
सर्वसाधारणपणे असे दिसून आले आहे की, बुधवारी प्रामुख्याने गुंतवणूकदारांनी औषध आणि आयटी समभागांची मोठय़ा प्रमाणात विक्री केली. तर सरकारी बँकांच्या समभागांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यापासून बाजार विक्रमी पातळीवर राहिला आहे. त्यामुळे आता समभागांच्या वाढलेल्या किमतींचा लाभ उठविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात समभाग विक्री करुन नफा कमाई करण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येते. हा कल आणखी काही काळ कायम राहील असा तज्ञांचा कयास आहे. जागतिक घडामोडींचा परिणामही शेअरबाजारांवर होत असल्याचे दिसत आहे.
एक्सचेंजमध्ये 3,107 समभागांमध्ये ट्रेडिंग झाले आहे. यामध्ये 1,516 समभाग तेजीत राहिले आहेत. तर 1,444 समभाग मात्र घसरणीत राहिले आहेत. घसरणीच्या या प्रवासात लिस्टेट कंपन्यांचे बाजारमूल्य 205.61 लाख कोटी रुपयावर पोहोचले आहे. 16 फेब्रुवारी रोजी हे मूल्य 205.80 लाख कोटीवर राहिले होता. एनएसईच्या प्रोव्हिजनल माहितीनुसार विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,144.09 कोटी रूपयांच्या समभागांची खरेदी केली असून देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी मात्र 1,559.53 कोटी रुपयाच्या समभागांची विक्री केलेली आहे.
बँकांचे खासगीकरण होणार असल्याने मोठय़ा प्रमाणात इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंडिया यांच्या समभागांची खरेदी होत आहे. 20 टक्क्यांनी वधारले होते. निफ्टीमध्येही बँक निर्देशांक 5.86 टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले होते.