नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरकारी तेल कंपन्यांनी सलग दुसऱया दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. बुधवारी देशात पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेलचे दर 21 पैसे प्रति लिटरमागे वाढवण्यात आले आहेत. मागील तीन आठवडे पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणत्याही प्रकारची वाढ नोंदवण्यात आली नव्हती. या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत फेरबदल होऊनही 18 दिवसांनंतर मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा बुधवारी वाढ करण्यात आली आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडताच महागाईच्या झळा बसायला सुरूवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सुधारित दरांनुसार पेट्रोलचे दर दिल्लीत 90.74 रुपये, मुंबईत 97.12 रुपये, कोलकात्यात 90.92 रुपये तर चेन्नईत 92.70 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. तसेच डिझेलची विक्री दिल्लीमध्ये 81.12 रुपये, मुंबईत 88.19 रुपये, कोलकात्यात 83.98 रुपये आणि चेन्नईत 86.09 रुपये प्रतिलिटर दराने केली जात आहे.