डेहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्करसिंग धामी यांचा शपथविधी झाला आहे. येथील परेड ग्राऊंड येथे झालेल्या दिमाखदार समारंभात त्यांना राज्यपाल गुरुमित सिंग यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासह आठ मंत्र्यांनीही शपथग्रहण केले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक वरीष्ठ आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. धामी हे 46 वर्षांचे आहेत.
धामी यांच्या नेतृत्वातच भाजपने यंदाची विधानसभा निवडणूक जिंकली होती. धामी विधानसभेचे सदस्य नसल्याने त्यांना 6 महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून यावे लागणार आहे. उत्तराखंडमध्ये विधान परिषद नसल्याने त्यांना विधानसभेवर निवडून येणे आवश्यक ठरणार आहे. त्यांच्यासाठी एका आमदाराने राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
आठ मंत्र्यांचा समावेश
धामी यांच्यासह सत्पाल महाराज, धनसिंग रावत, सुबोध उनीयाल, प्रेमचंद अग्रवाल, रेखा आर्य, गणेश जोशी, चंदनराम दास आणि सुबोध बहुगुणा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सुबोध बहुगुणा हे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे पुत्र आहेत. सुबोध बहुगुणा, चंदनराम दास आणि प्रेमचंद अग्रवाल यांचा अपवाद वगळता इतर सर्व मंत्री मागच्या मंत्रीमंडळातही होते. प्रेमचंद अग्रवाल हे मागच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांना आता मंत्रीपद देण्यात आले आहे. सर्व मंत्र्यांचे विभाग येत्या काही दिवसात निश्चित करण्यात येणार आहेत.
इतर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्माही आवर्जून उपस्थित होते.