सेन्सेक्स 522.01 अंकांनी वधारला : आयडीबीआय तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
कोविड 19 आणि लॉकडाऊनच्या सलगच्या मागील दोन महिन्यांच्या प्रवासात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे त्याचा काहीसा परिणाम हा शेअर बाजारातील कामगिरीवर होत असल्याचे पहावयास मिळत होते. परंतु सध्या लॉकडाऊन 5 मध्ये केंद्राने अनलॉक ही संकल्पना पुढे करत देशातील उद्योगधंद्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठीची नियमावली सादर केली आहे. यामुळे मागील आठवडय़ापासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिल्याचे दिसून येत आहे.
चालू आठवडय़ातील सलग दुसऱया सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक तेजीत राहिले आहेत. सकाळी बाजार सुरु होताना सेन्सेक्स 146.67 अंकांनी आणि निफ्टी 54.7 अंकांनी वधारले होते. मात्र दिवसअखेर सेन्सेक्स 522.01 अंकांनी वधारुन निर्देशांक 33,825.53 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 152.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,979.10 वर बंद झाला आहे.
दिवसभरातील ट्रेडिंगच्या दरम्यान सेन्सेक्स 563.11 अंकांनी कार्यरत राहिला होता. दिग्गज कंपन्यांमध्ये आयडीबीआयचे समभाग 19.92 टक्क्मयांनी वधारले होते. यामुळे दिवसभरात बँकिंगचे समभाग वधारले आहेत. त्यामध्ये इंडसइंड बँक 7.56,ऍक्सिस बँक 4.47, आयसीआयसीआय बँक 2.95, फेडरल बँक 2.25 आणि स्टेट बँकेचे 0.26 टक्क्मयांनी समभाग वधारले होते.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये दोन हजार 611 कंपन्यांच्या समभागांमध्ये टेडिंग झाले आहे. यातील 1,740 कंपन्यांचे समभाग वधारले तर 718 कंपन्यांचे समभाग मात्र घसरले. कोविड संकटामधून सावरण्यासाठी केंद्राने विविध घटकांना अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे मान्सून सकारात्मक राहण्याच्या हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेती क्षेत्राकडून अर्थक्यवस्थेला दिलासा मिळणार असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.