प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेली बाधित वाढ तीन अंकावर असलेली तर सलग दुसऱया दिवशी बाधित वाढीचा आलेख खाली घसरला आहे. रविवारी 480 बाधित आले तर सोमवारी 529 बाधित वाढ समोर आली. तर गत दोन महिन्यात प्रथमच मृत्यूचा आलेखही मोठया प्रमाणात खाली घसरला असून फक्त 2 बाधितांचा मृत्यू झालीची माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्याने बाधित वाढीसह मृत्यूदरही घटल्याचा दिलासा जिल्हयाला लाभला आहे.
दरम्यान, जिह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 529 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला. तर मंगळवारी सायंकाळी 791 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
मृत्यू संख्येचा फुगवटाही संपला
गेल्या दोन महिन्यात काही वेळा मृत्यू संख्येने जिल्हावासियांची झोप उडवली होती. अचानक मृत्यू संख्येचे आकडेवारी मोठी आल्यानंतर नागरिक पॅनिक होत होते. ’तरुण भारत’ ने फुगणारा आकडा विविध तारखांचे मृत्यू एकाच दिवशी देण्यात येत असल्याचे पुराव्यानिशी मांडले. त्यानंतरही फरक पडला नव्हता. शुक्रवारी 52 मृत्यू एकाच दिवशी नोंद दाखवण्यात आल्यानंतर याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता पुन्हा कोव्हिड हॉस्पिटल्स आकडे वेळेवर अपडेट करत नसल्याची बेशिस्त समोर आली. त्यानंतर उशिरा नोंद केलेले मृत्यू व त्या दिवशीचे मृत्यू अशी आकडेवारी देण्यात येत असतानाच सोमवारी फक्त दोनच बाधितांचा मृत्यू झाल्याचा आकडय़ाने मृत्यूदर घटल्याचा दिलासाही लाभला आहे.
सातारा, फलटणमध्ये वाढ सुरुच
जिल्हय़ात सलग दुसऱया दिवशी बाधित वाढीचा वेग मंदावल्याचा दिलासा असला तरी सातारा व फलटण तालुक्यात तीन अंकी संख्येने सुरु असलेली बाधित वाढ चिंता वाढवत आहे. तर कराडमध्ये सलग दुसऱया दोन अंकी संख्येने वाढ समोर आली हा मंदावलेला वेग कराडकरांसाठी दिलासादायक आहे. तर कोरेगाव, माण, खटाव, वाई, खंडाळय़ात वेग मंदावू लागला असून जावली, पाटण, महाबळेश्वर एक अंकी संख्येवर आल्याने या तीन तालुक्यांना मोठा दिलासा लाभला आहे.
वेग मंदावतोय ः 529 बाधित
सोमवारच्या अहवालानुसार तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. फलटण 115 (34,011), सातारा 113 (48,538), कोरेगाव 74 (20,561), कराड 59 (37,432), माण 50 (16,448), खटाव 42 (23,743), वाई 26 (15,208), खंडाळा 19 (13,708), जावली 8 (9,747), पाटण 6 (9,882), महाबळेश्वर 3 (4,566), इतर 14 (1,852) असे आज अखेर एकूण 2,35,696 नागरिकांचे अहवाल बाधित आहेत.
मृत्यूदर घटल्याचा दिलासा ः 2 मृत्यू
सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (212), कराड 0 (1,138), खंडाळा 0 (186), खटाव 0 (584), कोरेगाव 0 (446), माण 0 (370), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (357), फलटण 2 (656), सातारा 0 (1,424), वाई 0 (356) व इतर 0 (76), असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 5,893 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्तीचा वेग वाढला
दोन दिवसात 2 हजार 369 जण कोरोनामुक्त झाले असून जिल्हय़ात गत दोन दिवसांपासून आशादायी चित्र निर्माण होवू लागले आहे. सोमवारी 1 हजार 578 तर मंगळवारी 791 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. कोरोनामुक्तीचा वेग वाढू लागला असून आजपर्यंत 2 लाख 23 हजार 533 जणांनी कोरोनामुक्त होवून कोरोनाविरुध्दच्या लढाईला बळ दिले आहे. त्यामुळे उपचारार्थ रुग्ण संख्येच आलेख खाली येवू लागला आहे.