प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरात हिसडा टोळीने सलग दुसऱ्या दिवशी हिसडा मारून तीन तोळ्याचे ९० हजार रूपये किमंतीचे मंगळसुत्र पळवून नेले आहे. ही घटना खरे क्लब ते धामणी रस्त्यावर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली आहे. याबाबत सौ. विद्या दत्तात्रय पैं रा. माळी टॉकिज, गुलमोहोर कॉलनी, विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी सौ. विद्या पै या खरे क्लब हाऊस येथे एका लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या नातेवाईक महिलेसोबत दुचाकीवरून गेल्या होत्या. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्या दोघी खरे क्लब हाऊस येथून धामणी रस्त्यावरून दुचाकीवरून परत असताना अचानक पाठीमागून एक मोटारसायकल स्वार आला आणि त्यांने सौ. पै यांना काही समजण्याच्या आधीच त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याच्या मंगळसुत्राला हिसडा मारला.
आणि हे मंगळसुत्र पळवून नेले. हा हिसडा मारल्यानंतर पै यांनी तात्काळ दुचाकी थांबविली आणि आरडाओरड केली पण या हिसडा मारणाऱ्या दुचाकीस्वाराने वेगाने पळ काढला. दरम्यान या परिसरातील नागरिकांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो मिळून आला नाही. तात्काळ पै यांनी याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यास दिली.