फेब्रुवारीत 1 लाख 13 हजार कोटी संकलन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी महिन्यात वस्तू-सेवा कराचे (जीएसटी) देशभरातील संकलन 1 लाख 13 हजार कोटी रुपयांचे झाले आहे. 1 लाख कोटीहून अधिक करसंकलन होण्याचा हा सलग पाचवा महिना आहे. फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत हे संकलन 7 टक्के अधिक आहे. यावरून अर्थव्यवस्था सुधारत आहे आणि बाजारात मागणी वाढत आहे, हे स्पष्ट होते.
फेब्रुवारी 2021 मध्ये आयात वस्तूंवरील जीएसटीत मागच्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत 15 टक्के वाढ दिसून आली. तसेच सेवांच्या आयातीतून 5 टक्के अधिक उत्पन्न मिळाले. मागच्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये हे संकलन 1.20 लाख कोटी होते. तो आतापर्यंतचा मासिक विक्रम होता.
भारतात जून 2017 पासून वस्तू-सेवा करप्रणाली (जीएसटी सिस्टीम) लागू करण्यात आली. मध्यंतरी कोरोनाच्या काळात तीन महिने लॉकडाऊनच्या अटी कठोर असल्याने करउत्पन्न बऱयाच प्रमाणात घटले होते. आता ते पूर्वस्थितीत येत असून काही प्रमाणात वाढले आहे. यापुढच्या काळात ते स्थिरावणार असून अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येईल, असा केंद्रीय अर्थ विभागाचा विश्वास आहे.