जीएसटी मंडळाकडून घोषणा, 10 हजार कोटीचा विक्रमी अधिभार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
फेब्रुवारी महिन्यात जीएसटी (वस्तू-सेवा कर) संकलन 1 लाख 33 हजार 26 कोटी रुपयांचे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सलग पाचव्या महिन्यात करसंकलनाने 1 लाख 30 हजार कोटीचा टप्पा ओलांडला आहे. तसेच प्रथमच आयातीवर आकारल्या जाणाऱया अधिभाराचे (सेस) संकलनही 10,340 कोटी रुपयांचे झाले. अर्थव्यवस्था सावरत असल्याची ही चिन्हे आहेत.
फेब्रुवारीतील जीएसटी संकलन 2021 मधील याच महिन्याच्या तुलनेत 18 टक्के, तर 2020 मधील याच महिन्याच्या तुलनेत 26 टक्के जास्त आहे. मात्र, जानेवारी 2022 मधील विक्रमी 1 लाख 40 हजार कोटीच्या तुलनेत ते काहीसे कमी आहे. तथापि, फेब्रुवारीतही काही प्रमाणात कोरोनाच्या तिसऱया उद्रेकाचा प्रभाव राहिल्याने ते कमी झाले. मार्च महिन्यात आणखी सुधारणा शक्य आहे.
फेब्रुवारीत केंद्रीय जीएसटीचे संकलन 26,347 कोटी, राज्य जीएसटी संकलन 21,909 कोटी तर केंद्र-राज्य एकत्र संकलन 50,782 कोटी रुपयांचे झाले. आयात मालावरील अधिभारापोटी झालेले संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत तब्बल 36 टकके अधिक आहे, अशीही माहिती देण्यात आली.
अर्थव्यवस्था सुधारण्याच्या स्थितीत गेल्या सहा महिन्यांमध्ये कोरोनाच्या तिसरा उद्रेक असतानाही जीएसटी संकलन समाधानकारक झाले आहे. याचा अर्थ अर्थव्यवस्था रुळावर येत आहे, असा लावला जात आहे. बाजारात मागणी वाढली असून खरेदीच्या प्रमाणात वाढ होत आहे. सणासुदीच्या काळात व्यापार चांगल्यापैकी वाढल्याने अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. हाच कल आगामी महिन्यांमध्येही कायम राहील अशी आशा व्यक्त होत आहे.