ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सलग बाराव्या दिवशी देखील म्हणजेच गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल – डिझेलच्या दरात 53 पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत 77.28 रुपयांवरून 77.81 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर डिझेलची किंमतीत 64 पैसे वाढ झाली आहे त्यामुळे डिझेलची किंमत 76.43 रुपये झाली आहे.
मुंबईकरांना देखील दर वाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. मुंबईत आज पेट्रोल 84.66 रुपये झाले. बुधवारी पेट्रोलचा भाव 84.15 होता. तर डिझेलचा दर प्रति लिटर 74.93 रुपये झाला आहे.
या बरोबरच कोलकाता आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी अनुक्रमे 79.59 आणि 81.32 मोजावे लागणार आहेत. तर डिझेलची किंमत अनुक्रमे 71.96 व 74.23 इतकी करण्यात आली आहे. अशा प्रकारे दररोज पेट्रोल – डिझेलच्या किंमती बदलत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोना संकटाबरोबरच सामान्यांना महागाईचा झळ सहन करावी लागणार आहे.