प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठवडय़ात बँकांना सलग सुटय़ा होत्या. आठवडय़ात केवळ 3 दिवस बँकांचे कामकाज चालले. बँका बंद असल्याने त्याचा परिणाम आर्थिक उलाढालींवर झाला. सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवार बँका उघडल्याने पैसे भरणे व काढण्यासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. आर्थिक व्यवहार वाढल्याने बँक कर्मचाऱयांना तारेवरची कसरत करावी लागली.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ाची सुरुवातच दसऱयाच्या सुटीने झाली. मंगळवार, बुधवार व गुरुवार असे तीनच दिवस बँकांचे कामकाम चालले. शुक्रवारी ईद ए मिलादसाठी सुटी, शनिवारी वाल्मिकी जयंतीनिमित्त सुटी होती तर रविवारी साप्ताहिक सुटी होती. यामुळे मोठे आर्थिक व्यवहार थंडावले होते. त्यांना रक्कम मिळण्यासाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळेच सोमवारी बँकांसमोर नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.
एटीएममध्ये खडखडाट
सलग सुटय़ांचा परिणाम हा बँकांच्या व्यवहारासोबतच एटीएमवरही जाणवला. शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील एटीएममध्ये खडखडाट होता. बऱयाच एटीएम बाहेर ‘नो कॅश’चे फलक लावण्यात आले होते. यामुळे नागरिकांना पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये पैसे आहेत का? असे विचारत फिरावे लागले. ज्यांना तात्काळ रकमेची गरज आहे त्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे बँका बंद असल्या तरी एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत होते.
पगार-पेन्शनसाठी गर्दी
महिन्याच्या एक तारखेला सरकारी कर्मचाऱयांचे पगार व पेन्शन त्यांच्या खात्यांमध्ये जमा होते. नोव्हेंबर महिन्याची पेन्शन व पगार काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी दोन तारीख असल्याने पेन्शनधारकांची गर्दी झाली होती. बँकांनी जेष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची सोय केली होती. काही ठिकाणी मात्र उन्हात उभे राहावे लागल्याने नाराजीचा सूर उमटत होता.