गोडोली / प्रतिनिधी :
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या टीमने सलग २२ तासांची विशेष बस तपासणी मोहीम राबवत तब्बल १२६ बसेसवर कारवाई केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२४ फेब्रुवारी रोजी दु.३ ते दि. २५ फेब्रुवारी दु.१२ पर्यंत सलग २२ तासात हि कारवाई करत आदेशाची अंमलबजावणी केली आहे.
परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार आनेवाडी टोलनाक्यावर ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेस, खासगी बसेसमधून माल वाहतूक, वाहन चालविताना
मोबाईलचा वापर, सीट बेल्ट, रिफ्लेक्टर, लेन कटिंग, विमा प्रमाणपत्र, पी.यु.सी. प्रमाणपत्र, बेदरकारपणे वाहन चालविणे, धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे, विना परवाना, विना योग्यता प्रमाणपत्र, अवैध प्रवासी वाहतूक, ओडीसी वाहतुक करणाऱ्या १२६ वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली. त्यात टप्प आणि अन्य ठिकाणी साहित्य, पार्सल ठेवलेले निदर्शनास आलेल्या २६ वाहनांवर रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गुन्ह्याचे प्रकारानुसार कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण हे मार्गदर्शन करत स्वतः आणि वाहन निरीक्षक, अधिकारी असे ३ टीममध्ये ३० अधिकारी सहभागी झाले होते.