कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारीवर्ग, पोलीस आणि प्रशासनाने दिवसरात्राची पर्वा न करता स्वतःला मानवतेच्या सेवेत वाहून घेतले आहे. अशाच प्रकारचा एक किस्सा तामिळनाडूतून समोर आला आहे. तेथे 8 महिन्यांच्या गरोदर परिचारिकेने रुग्णांच्या उपचाराकरता 250 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.
रामनाथपुरम येथील 25 वर्षीय परिचारिका तिरुची येथील रुग्णालयात कार्यरत आहे. एस. विनोथिनी नावाची ही परिचारिका सध्या 8 महिन्यांची गरोदर आहे. विनोथिनीला रामनाथपुरम येथील आरोग्य सेवेच्या संयुक्त संचालकाने फोन करून कोरोना रुग्णांच्या उपचारात मदतीकरता निवडण्यात आल्याची माहिती दिली.
पतीसोबत केला प्रवास
परिचारिकेला 3 दिवसांच्या आत रामनाथपुरम प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत रुजू होण्यासाठी पत्र पाठविण्यात आले होते. विनोथिनीने स्वतःची तसेच गर्भात वाढणाऱया बाळाची चिंता न करता तिरुची येथून 250 किलोमीटर अंतरावरील रामनाथपुरम येथे जाण्याचा निर्णय घेतला.लॉकडाउनच्या काळात प्रवास करण्यासाठी परिचारिकेने पर्यटन मंत्री वेल्लमंडी एन. नटराजन यांच्याशी संपर्क केला. तिच्या प्रयत्नांमुळेच जिल्हाधिकाऱयांकडून त्यांना एक पास देण्यात आल्याने टाळेबंदीतही त्यांना बाहेर पडण्याची तसेच प्रवास करण्याची अनुमती मिळाली आहे.