प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात सवणस येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेला संक्शन पंप फोडून नदीत बुडवण्याची धडक कारवाई येथील तहसीलदार पाजक्ता घोरपडे यांनी केली. कर्जी, सवणस, राजवेल आदी भागात वाळू वाहतुकीसाठाच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे खोदून मार्गही बंद केला असून या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
खाडीपट्टा विभागात कर्जी, सवणस परिसरात वाळू उत्खननास बंदी असतानाही छुप्या पद्धतीने वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महसूलकडे केल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांकडेही या बाबत तक्रार करण्यात आली होती. प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी विभागातील मंडल अधिकारी, तलाठी यांना चौकशीचे आदेश दिले होते.
या चौकशीदरम्यान जगबुडी नदीपात्रात सक्शनपंपाद्वारे वाळू उपसा होत असल्याचे उघड झाल्यानंतर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी होडीतून घटनास्थळी जाऊन पथकामार्फत नदीतील संक्शन पंप फोडून पाण्यात बुडवला.
वाळूची वाहतूक करण्यासाठी असलेले रस्त्यांवर मोठमोठे खड्डे खोदून पुन्हा या मार्गाने वाहतूक होणार नाही. याची दक्षता महसूलच्या पथकाने घेतली आहे. या धडक कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या धडक कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.