अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 4 सप्टेंबर 2021, सकाळी 10.00
●जिल्हा रुग्णालयातली टेस्टिंग लॅब बंद
●6 हजार जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
●बाधितापेक्षा डिस्चार्ज होणाचे प्रमाण कमी
●तपासण्या निम्याने घटल्या
●351बाधित तर पॉझिटिव्हीटी रेट 4.59 वर
●लसीकरणाला आला आहे वेग
सातारा / प्रतिनिधी :
गणेशोत्सवाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात अनलॉक झाल्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे सर्वच ठिकाणी दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापरणारे हाताच्या बोटावर दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच काल बजावून सांगितले आहे नियम पाळा म्हणून. पण नियमाला कोलदांडा दिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात swab तपासणी करण्याची लॅब बंद पडली आहे. त्यामुळे 6 हजार जणांचे swabचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे काल 7647 जणांच्या तपासण्या झाल्या असून 351जण बाधित आढळून आले आहेत. 4.59 पॉझिटीव्हीटी आलेली आहे.
जिल्हा रुग्णालयातली लॅब बंद
कोरोनाची स्वाब तपासणी करणारी लॅब जिल्हा रुग्णालयात लाखो खर्च करून सूरु केली आहे. मात्र ही लॅब काही कारणास्तव बंद पडली असल्याने तपासणीसाठी घेण्यात आलेले 6 हजार स्वाब बाहेर पाठवले गेले आहेत. त्यामुळे त्यांचे अहवाल येण्यास विलंब लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या लॅबमध्ये अचानक बंद पडल्याचा फटका जिल्हावासीयाना बसू लागला आहे. ही लॅब सुरू करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दररोज होणाऱ्या 12 हजार तपासण्यापैकी केवळ 7647 जणांच्या तपासण्या झालेल्या आहेत.
नियमाला कोलदांडा, तोंडावरचा मास्क गायब
कोरोना अजून गेलेला नाही हे वारंवार मंत्री ओरडून सांगत आहेत. राजकीय कार्यक्रमात गर्दी जमते. तिथपासून ते सार्वजनिक ठिकाणी सगळीकडेच नियमाला हरताळ फासला जात आहे. मास्कचा वापर करणारे हाताच्या बोटावर असणारे दिसतात. जिल्ह्यातील बहुतांशी शहरात आणि मोठ्या गावात हीच परिस्थिती आहे. त्यातच गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीत अधिकारीच बिना मास्कचे भाषण झोडताना दिसतात. त्यामुळे सर्वसामान्याना तरी नियम कसा लक्षात राहील.
लसीकरणाला वेग
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण मोहीम जोरदार सुरू झालेली आहे. लसीकरण आपल्या गावात आपल्या जवळच्या ग्रामस्थांचे कसे होईल यासाठी गाव पुढारी खटपट करत आहेत. तर कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील गावागावात खाजगी पातळीवर स्पुतनिक या लसीचा डोस देण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पहिले आमदार महेश शिंदे हे ठरणार आहेत की स्वतःच्या पैशाने मतदार संघात लसीकरण मोहीम राबवणार आहेत. माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा या मोफत लसीकरण राबवतात तर जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी का नाही मोहीम राबवू शकत असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यत 19 लाख 22 हजार 922 जणांनी लस घेतली असून त्यात पहिला डोस 13 लाख 65 हजार945 जणांनी तर दुसरा डोस 5 लाख 57 हजार7 जणांनी लस घेतली आहे.
डिस्चार्जचा वेग मंदावला
दिवसाला पाचशे ते सहाशे जण बाधित आढळून येत आहेत. त्या प्रमाणात डिस्चार्ज होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.काल दिवसभरात केवळ 167 जणांना डिस्चार्ज मिळाला होता.
शनिवारपर्यंत
एकूण नमूने – 18,36,056,
एकूण बाधित – 2,41,458
घरी सोडण्यात आलेले – 2,28,112
मृत्यू – 6,059
उपचारार्थ रुग्ण – 10,349