इ-कॉमर्स वेबसाईट्सच्या फेस्टिवल ऑफर्समध्ये भरपूर सवलती दिल्या जातात. कपडय़ांपासून विविध ऍक्सेसरीजवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. सवलतींचे हे आकडे बघून आपले डोळेही विस्फारतात. पाच हजार रुपयांची साडी दीड हजार रुपयांना मिळतेय म्हटल्यावर आपणही खरेदी करून टाकतो. पण प्रत्यक्षात विक्रेत्यांना एवढी सवलत देणं शक्य नसतं. त्यामुळे दर्ज्याच्या बाबतीत फसवणूक होऊ शकते.
चित्रात दिसणारा आणि प्रत्यक्षात आपल्या हातात येणारा माल कसा असेल याची अजिबात खात्री देता येत नाही. शॉपिंग वेबसाईट्स 80 टक्क्यांपर्यंत सवलती देण्याचा दावा करत असल्या तरी प्रत्यक्षात या सवलती मोजक्याच उत्पादनांवर दिल्या जातात. इतर उत्पादनांवर एवढी सवलत मिळत नाही. कपडे तसंच काही ऍक्सेसरीजवर 80 टक्के सवलत मिळते. असा सवलतीत घेतलेला माल बरेचदा जुनाही असू शकतो.
तसंच काही दुकानदार जुना माल 80 टक्के सवलतीत देतात. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी नीट पडताळणी करून घ्या. कमी दर्जाची वस्तू आली तर ती परत पाठवून द्या. खरेदी करण्याआधी वेगवेगळ्या साईट्स धुंडाळा. वस्तूची खरी किंमत आणि त्यावर दिली जाणारी सूट याबाबत माहिती घ्या. यानंतरच खरेदी करा. सवलतीत मिळणारी प्रत्येक वस्तू चांगली असेलच असं नाही. त्यामुळे उगाचच भरपूर खरेदी करू नका. आधी थोडय़ा वस्तू मागवून बघा. मगच पुढे जा. सवलतींना भुलून केलेली घाई महागात पडू शकते.